बुद्ध पौर्णिमेला केली जाणारी कार्ये :-
बुध्द पौर्णिमालाच 'वैशाख पौर्णिमा' म्हटले जाते. वैशाख पौर्णिमाला पाली भाषेत 'वेसाको पौर्णिमा' म्हणतात. ही पौर्णिमा साधारणता: मे महिण्यात येते. बुद्ध कालीन म्हणजे सुमारे दोन हजार वर्षापूर्वी आजच्या सारखी विद्यूत दिव्यांची सुविधा उपलब्ध नव्हती. निसर्गनियमानुसार चंद्र पूर्णकृती असतो म्हणून पृथ्वी चंद्राच्या प्रकाशांनी तेजोमय होते. अशा चंद्राच्या शीतलमय प्रकाशात धम्मोपदेश करणं सोयिस्कर होत होतं, म्हणून प्रत्येक पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात तथागत भगवान बुद्ध उपासकांना धम्मदिक्षा, धम्मज्ञान व उपदेश देत असत म्हणून बौद्ध धम्मात , बौद्ध संस्कृतीत १२ ही पौर्णिमांना अतिशय महत्व आहे , परंतु त्यात बुद्ध पौर्णिमाला मात्र विशेष महत्व आहे कारण या पौर्णिमेला तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनात तीन महत्वपूर्ण घटना घडल्यात त्या पुढीलप्रमाणे-
१) तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म :
इ.स.पूर्व ५६३ ला शाक्य गणराज्याची राजधानी कपिलवस्तुचा राजा शुध्दोधनाची महाराणी महामाया ही आपल्या नहैर देवदह येते जात असतांना रस्त्यात लुंबिनी जंगलात (नेपाल ) तिच्यापोटी राजपुत्र सिध्दार्थांचा जन्म झाला तो दिवस वैशाख (वेसाको) पौर्णिमेचा होता.
२) तथागत गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती :
वयाच्या २७ व्या वर्षी गृहत्यागाच्या पश्चात सिद्वार्थ सात वर्षापर्यंत वनात भटकत राहीले. तेथे त्यांनी कठोर ध्यान-साधना (विपश्यना) केली आणि शेवटी ३५ व्या वर्षी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बिहारमधील बोधगया (बुध्दगया) येथे बोधीवृक्षाखाली त्यानां बुद्धत्वज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणून हा दिवस बुद्ध पौर्णिमेच्या रूपात साजरा केला जातो.
३) महापरिनिर्वाण दिन :
इ.स.पूर्व ४८३ ला उत्तरप्रदेश स्थित कुशीनगर येथे साल वनात जोडवृक्षाखाली तथागत गौतम बुद्ध ८० व्या वर्षी आपल्या पार्थिव शरीराचा त्याग करून महापरिनिर्वाणस्त प्राप्त झाले. तो दिवस वैशाखी पौर्णिमेचा होता. कुशीनगर येथील महापरिनिर्वाण विहारातील भव्य अशी तथागताची मूर्ती ही एक कलात्मक मूर्ती आहे. झोपलेल्या मुद्रेत २० फूट लांबीची बलुआ दगडाची ही मूर्ती तेथे आलेल्या प्रत्येकांचे लक्ष वेधून घेते. तेथील भव्यतेचे, तेथील निर्मितीचे वर्णन पाचव्या शतकातील चीनी प्रवाशी फाय्यान यांनी आपल्या ग्रंथात केले आहे. त्या संपूर्ण परिसरात अलौकिक अशी शांतता पसरलेली आहे. या ठिकाणी वर्षभर देशविदेशातील पर्यटकांची गर्दी असते. तेथील सुगंधीत अगरबत्ती आणि 'बुध्दम् शरणम् गच्छामी' या घोषणांनी वातावरण पवित्र व शांतीमय होऊन जाते.
तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनातील वरील तिन्ही महत्त्वपूर्ण घटना वैशाखी पौर्णिमालाच घडल्याने बौद्ध धम्मात हा दिवस फार पवित्र मानला जातो. शिवाय बौद्ध अनुयायांसाठी 'बुद्ध पौर्णिमा' हा सर्वात मोठा सण असतो. तसेच ही पौर्णिमा भारतातच नव्हे तर श्रीलंका, कंबोडिया,नेपाल,चीन,भुतान,सिलोन, जापान, थायलंड, इंडोनेशिया , म्यानमार(ब्रह्नदेश), मलेशिया अशा कितीतरी राष्ट्रात त्या त्या देशातील प्रथा- परंपरानुसार खूपच हर्षोउल्हासात साजरी केली जाते.
● बुद्ध पौर्णिमाला केले जाणारे कार्य ●
१) या दिनी बोधी वृक्षाला विविध फुलांनी व दिपांनी सजवून त्या वृक्षाची पुजा केली जाते.
२) या दिनी बौद्ध अनुयायी आपली घरे दिप-सुमनांनी सजवून तसेच पांढरी शुभ्र वस्रे परिधान करून महाकारुनिक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करीत सुगंधित अगरबत्ती आणि मोमबत्ती प्रज्वलीत करून त्रीशरण -पंचशील ग्रहण करीत वंदना घेतली जाते. तसेच विविध खाद्यपदार्थ -पक्वानं तयार केली जातात. त्यात विशेष म्हणजे 'खीर' हा गोड पदार्थ असतोच.
३) या मंगलमय दिनी बौद्ध अनुयायी परिवारासह सामुहिक ध्यान-साधना करतात, शिवाय विहारं किंवा ध्यान शिबीर केंद्रांच्या माध्यमातून बाल शिबिरापासून ते वृद्धांपर्यंत विपश्यना शिबिराचे आयोजन केले जाते.
४) या दिनी जगभरातून बौद्ध धम्माचे अनुयायी बुद्धगयाला भेट देतात. बोधीवृक्षा खाली ध्यान-साधना व वंदना करतात.
५) या पौर्णिमाला बौद्ध धम्मग्रंथाचे निरंतर पठन केले जाते.
६) बौद्ध विहारात भिक्षु-भिक्षुनींद्वारे सुत्त पठन व उपासक-उपासिकांना प्रवचन दिले जाते.
७) या दिनी पुण्यकार्य म्हणून गोरगरीबांना भोजनदान, वस्त्रदान व श्रमदानही केले जाते.
८) दिल्ली संग्रालयाद्वारे बुद्धअस्थी बाहेर काढून सर्वधर्माच्या अनुयायांकरीता दर्शनासाठी ठेवल्या जातात.
९) भारताबरोबर अनेक बौद्ध राष्ट्रात तथागत् गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
परंतु मागच्या वर्षापासनं भयंकर अशा कोरोनाच्या महामारीनं या जगात हाहाकार माजवला असला तरी सोशल मिडियाद्वारे तथागत भगवान बुद्धांवर आधारित भाषणं-संभाषणे,चर्चा-परिषदा, काव्य संमेलन घेऊन साजरी केली जाते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा